अॅमेझॉनच्या खोर्यातला एक विकसनशील देश. तिथलं भ्रष्ट सरकार. गरीब, नाडलेले, शोषित लोक. अस्ताव्यस्त, निबीड, गर्द, स्तिमित करणारं जंगल आणि त्यातले प्राणी. लाकूड आणि खनिजं यांसाठी त्या जंगलावर डोळा ठेवून असलेल्या बड्या कंपन्या. विकासाच्या नावाखाली वाढते रस्ते. विरळ होत जाणारं, लचके तोडले जाणारं, नैसर्गिक आणि कृत्रिम वणव्यांखाली भाजून काढलं जाणारं... अपरिहार्यपणे आटत-आक्रसत जाणारं जंगल. हक्काचा अधिवास गमावणारे, परागंदा होणारे, कधी कुणा श्रीमंती फॅडपायी शिकार होऊन कातडी वा दातरूपानं उरणारे, कधी सर्कशीत विकले जाणारे, कधी कुणा अतिश्रीमंत विकृत चाळ्यांपायी ‘पाळीव’ केले जाणारे, अक्षरशः मुक्यानं सोसणारे प्राणी.
या प्राण्यांच्या अपेष्टा सहन न होऊन कुणीतरी कधीतरी आंदोलन उभं केलं. प्राण्यांच्या अंदाधुंद छळावर नियंत्रण आणलं. पण त्यांना ठेवायचं कुठे? लहानपणी नैसर्गिक अधिवासात न वाढलेले आणि आता मोकळे केलेले वन्य पशू कुठे कसे जगतील, तगतील? तगतील का? त्यांच्यासाठी कुणीतरी पदरचा पैसा खर्चून जमीन खरीदली. तिथे अभयारण्य आणि प्राणिसंग्रहालय यांच्या मधली एक व्यवस्था कशीबशी उभी केली. त्यांना खायलाप्यायला मिळावं, त्यांना माफक का होईना – जंगलात वावरता यावं, आपणच त्यांच्यावर लादलेल्या छळाचं थोडं परिमार्जन करता यावं अशी ती यंत्रणा. अपुरा निधी, जगभरातून – विशेषतः विकसित देशांतून – कुतूहलानं येणारं स्वयंसेवक, आणि काही माणसांचं या प्राण्यांवरचं प्रेम – इतक्या बळावर चालत राहिलेली. रंगीत काकाकुवे आणि पोपट, शहामृगं, निरनिराळ्या जातींची माकडं, रानडुकरं, आणि मांजरं. पण घराच्या उबेला राहणारी नव्हेत हो. मोठाली मांजरं. बिबट्ये, जॅग्वार आणि प्युमा. कुणी छळापोटी चिडखोर बनलेलं. कुणी निराशेनं ग्रासलेलं. कुणी आत्महत्याप्रवण. कुणी अपंग. कुणी पंख छाटलेलं... त्यांना सर्वतोपरी जगवणारी माणसं. बाहेरच्या जगाशी जुळवून न घेता येणारी.
अशा एका पार्कात कुणी एक लॉरा कोलमन जाऊन पोचली. दुनियेची यशापयशाची चाकोरीबद्ध समीकरणं काही केल्या न समजणं, ‘माझंच बरोबर-जग गेलं खड्ड्यात’ अशा निबर-कोडग्या आत्मविश्वासाचा अभाव, मनातली व्याकूळता... अशा सगळ्यात भेलकांडत राहिलेली जेमतेम विशीतली, अस्वस्थ, असुरक्षित, अस्थिर मुलगी.
तिला त्या पार्कमधल्या ‘वायरा’ नामक प्यूमाबरोबर फिरण्याचं काम मिळालं. जेमतेम महिन्याभरापुरती पार्कात आलेली लॉरा सुरुवातीला धसकली, श्रमली, भ्यायली, रडली. पण कसा कोण जाणे, तिथे तिचा पाय टिकला. तिचं काहीतरी जुळलं. जंगलाशी. तिथल्या अनागर, उग्र रंगांशी, गंधांशी, नादांशी. तिथल्या प्राण्यांच्या अश्राप प्रेमाशी, भित्यांशी, असुरक्षिततांशी.
तिच्या तिथल्या सहकारिणीच्या शब्दांत सांगायचं, तर त्या प्राण्या-माणसांनी स्वतःच्या बचावासाठी स्वतःभोवती उभा केलेला एकेक थर त्या जंगलानं जणू हळूहळू सोलत नेला. आतलं अनाघ्रात कोवळेपण हळूहळू उजळत गेलं.
त्या प्रक्रियेची ही गोष्ट.
वाचताना काय वाटलं काय सांगू! वायरानं टाकलेलं एकेक बिचकतं पाऊल, तिच्या नजरेतली भीती आणि उग्र दहशत, तिच्या उरातली गुरगुर, तिनं लॉरावर केलेला हल्ला आणि मग तिच्या उरावर घुसळलेलं मस्तक... हा सगळा प्रवास अवाक होऊन पाहिला.
परिसंस्थेचं अक्षरशः सम्राटपण अनुभवणारे हे प्राणी. विस्तीर्ण अधिवासात मोजक्याच संख्येनं नांदणार्या राजासारखे. देहबोलीतली लय, तंदुरुस्ती, देखणेपण, डौल, दिमाख... या सगळ्यांनी परिपूर्ण असलेले. त्यांचं आपण हे काय करतो आहोत, या प्रश्नाचं उत्तर देता देववलं नाही, देववत नाही. दोषी तर आपण सगळेच जण आहोत. संडासाकरता अनेकानेक बादल्या फ्लश करणारे, विमानानं इकडून तिकडे सहजी उडणारे, कुठल्याही ऋतूत कुठल्याही प्रदेशातलं अन्न खाण्याची मिजास करणारे, अजून-अजून-अजून अशी भूक न संपणारे. आपली भूक कुठवर जाणार आहे? कशाकशाचा बळी घेऊन संपणार आहे?
ही विशीतली मुलं अशा प्रश्नांना न भिता प्राण्यांवर वेडं प्रेम करत राहतात. थकतात. विझतात. माघार घेतात. पुन्हा नव्यानं भिडतात. त्यांच्याबद्दल वाचताना नतमस्तक आणि हताश असं दोन्ही वाटलं. पण सरतेशेवटी तेही मनाशी उरलं नाही. लक्ष्यात राहिलं, ते लॉरा आणि वायरा यांचं एकमेकींवर विश्वासून, आनंदून, थरारून जंगल अनुभवणं.
द प्युमा इयर्स
लॉरा कोलमन
प्रथमावृत्ती २०२१
लिटिल ए प्रकाशन
('अनुभव', फेब्रुवारी २०२४ या अंकात प्रकाशित झालेला विस्तृत लेख इथे आहे.)
