फेसबुकाची सवय लागली आणि ब्लॉग बॅक-अपपुरता उरला. धार्मिक-राजकीय उन्मादकाळात फेसबुकवरच्या गर्दीनंही घाम फुटू लागला आणि तिथून फारकत घेतली. मग निवडणुका आणि व्याकूळता आणि अस्वस्थता या सगळ्याला व्हॉट्सॅपची किनार होती, आहे. तिथून अधिक आश्वस्त करणारी सोबत मिळवता आली, काही प्रमाणात पुरवताही आली. पण आता निकाल काहीही लागला, तरी तिथलं मायक्रोलेखनही हळूहळू आटत जाईल.
तंत्रज्ञान, माध्यमं, आणि वस्तू मिळून आपल्या मेंदूतल्या जोडण्या बदलत असतात हे आता आपल्याला नवीन नाही. त्यावर उत्तर काय, हे मात्र अजुनी तितकंसं धडपणी कळलेलं नाही. मधल्या काळात बघणं, वाचणं झालं. पण ‘आला मनात विचार, टिचव दोन पैसे,’ हे झालं नाही. आपण नाहीच काही म्हणलो, तर असा काय फरक पडणार आहे, असा एक काहीसा उदासीन विचार होता. पण हे ठरवून घडवलं असं म्हणणं म्हणजे स्वतःला फसवणं होईल. काही प्रमाणात मनःस्वास्थ्य टिकवण्याचा भाग होता, काही प्रमाणात आळस होता. काही प्रमाणात माध्यमांपासून दूर राहून बघणं होतं. फायदा झाला, नाही असं नाही. पण सगळ्याची गोळाबेरीज म्हणून जे काही थोडंफार नोंदी ठेवणं होतं, ते संपून गेलं.
या टप्प्यावर आपल्या लिहिण्या-वाचण्यात, बोलण्यात-ऐकण्यात, एकूणच वावरण्यात आणि जगण्यात आलेली अस्वस्थता, अधीरता, व्याकूळता, एकटेपणा, धास्तावलेपणा फारच प्रकर्षानं जाणवतो आहे. डाचतो आहे. अशा वेळी सवयीच्या माध्यमाच्या काडीचा आधार न वाटला, तरच नवल. म्हणून ब्लॉग.
काय वाचणं, काय बघणं चालू आहे, त्याच्या नोंदी ठेवणे इतकाच या बॅक टु ब्लॉग प्रकल्पाचा अर्थ. व्यक्त झालेली मतं चिमूटभर मिठासहितच घ्यायची.
~
वस्त्रहरण
प्रयोग अनुभवला. खूप धमाल आली. नाटक मला किंचित लांबलेलं वाटलं, पण ते अपेक्षितच होतं. आपल्याला आता पुष्कळच जास्त वेगाची सवय झालेली आहे. हे अर्धशतक जुनं नाटक किंचित संथ वाटणारच. पण मजा म्हणजे स्वतःच्या या घायकुतेपणाची जाणीव व्हावी, इतका धमाल प्रतिसाद प्रेक्षागृहातून होता. प्रयोग हाउसफुल्ल होता. लोक मनमुराद खिदळत होते. दारू पिऊन तर्राट असलेला अर्जुनाचा पार्टी, यच्चयावत पात्रांनी सूत्रधाराच्या धोतराला हात घालणं, सूत्रधाराच्या गोप्या नामक हरकाम्याचा मुक्त वावर, भलत्या जागी गदा लागल्यावर फेंगडत जाणारा दुर्योधन, बाईचा नाच बघण्याची इच्छा फेडून घेणारा देवाच्या अंगात आलेला देव, बाई स्टेजवर आली म्हणताना पाघळलेले तालीममास्तरांपासून ते सूत्रधारापर्यंत एकजात सगळे कोकणी बाप्ये, परक्या बाईच्या अंगाला हात लावू न देणारी दुःशासनाच्या पार्ट्याची बाईल… हे सगळे ट्रोप्स आणि त्यातले अश्लील होता-होता थबकलेले पण अजिबात न लाजता लिहिलेले निःसंशय चावट संवाद. दमदार संगीत. सगळ्यांवर कडी म्हणजे मालवणी बोलीचा सहज गोडवा. मजा का येऊ नये!
अगदी लहानलहान भूमिकांमध्येही कसलेले जबरदस्त नट असले की त्यानं नाटकाच्या अनुभवात किती नि कशी भर पडते, ते परत एकदा अनुभवलं. नटसंच बघताना मला उगाचच किंचित अभिमान वाटला. एरवी आपली नजर कायम आपल्या रम्य भूतकाळात रुतलेली असते, पण या नटसंचात जुने-जाणते असे जबरे नट होते, तितकेच नव्या दमाचे आणि लोकांना बांधून ठेवणारे खणखणीत नटही होते. असे नट काही प्रयोगांकरता का होईना, एकत्र येऊन हे चाळीसेक वर्षं जुनं नाटक करतात आणि लोक ते बघायला येतात, हे अनुभवताना मला जाम भारी वाटलं. असंही वाटलं, की सामाजिक-सांस्कृतिक अवकाशात फुसक्या गोष्टींचं भांडवल करून भावना दुखावल्या म्हणून बोंब ठोकणार्या राजकीय झुंडींमधली हवा काढून घ्यायची असेल, तर प्रेक्षक जाणता आणि जागता हवा. देवादिकांची निर्मळ चेष्टा करून पोट धरून हसणार्या–हसवणार्या नाटकांची आपली परंपरा जिवंत ठेवणे हाच त्यासाठीचा राजरस्ता असू शकतो, की नाही?
‘वस्त्रहरण’ जिवंत ठेवणार्या सगळ्यांबद्दल जाम कृतज्ञता वाटली.
~
‘लापता लेडीज’
~
बेबी
~
द लायन किंग
किती साधीसाधी तंत्रं! बांबूच्या घोड्यांचा वापर करून जिवंत केलेले जिराफ. एका विशिष्ट कोनात डोक्यावर पेहरलेले मुखवटे आणि मानेच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली करून चतुष्पाद प्राण्यांच्या हालचालींचा आणवलेला आभास. हरणांच्या बाह्याकृतीचे सांगाडे आणि त्यांना चाकं लावून करवलेल्या त्यांच्या पायांच्या धावत्या हालचाली, ते हाती धरून नाचर्या पायांनी पळणारे समूह आणि त्यातून जिवंत केलेले हरणांचे कळप. उंच काठ्यांना भिरभिर्यासारख्या फिरत्या चक्र्या लावून जिवंत केलेले पक्षी. कापडाच्या प्रचंड मोठ्या फिरत्या रिळांमधून वरखाली केल्या जाणार्या शिंगांच्या आकृत्या आणि त्यातून जिवंत केलेला रानगव्यांच्या पाठलागाचा प्रसंग. सांगावं तितकं कमी!
तीन मजली प्रेक्षागृह, त्याला दोन पाखांनी असलेल्या वाद्यवृंदाच्या गॅलर्या, आणि खुद्द मंच... हा सगळाच्या सगळा – उंचीसकटचा – अवकाश वापरून जिवंत केलेला जंगलाचा आभास. कुठे डोलकाठ्यांसारख्या उंच काठ्यांवरून भिरभिरणारे पक्षी, कुठे प्रेक्षागृहातून धावत अवतरणारे प्राणी, कुठे वाद्यमेळाच्या जागांतून डोकावणारे प्राणी... या सगळ्यातली कल्पकता अचंबित करून गेली.
संगीत आणि भाषाही थोडी बिनसरावाची असली, गोष्ट जुनीच असली, तरी नेपथ्य-रंगभूषा-वेशभूषेच्या या जादूनं तीन तास मंत्रमुग्ध करून ठेवलं. कर्टन कॉल अनुभवताना टाळ्या पिटणारे हात आणि ताल धरणारे पाय थांबता थांबेनात. पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या चेहर्यावर एकच हरखलेलं हसू. साहेबाच्या देशाच्या या श्रीमंतीचं अप्रूप-अप्रूप वाटलं.
~
तात्पर्य
~
तात्पर्य : दिसामाजी काहीतरी... :)




