‘मुक्त शब्द’च्या जून २०२४च्या अंकातला गणेश कनाटे यांचा लेख वाचला.
‘मनसमझावन’ या संग्राम गायकवाड यांच्या कादंबरीविषयीचा तो लेख आहे. शीर्षकात स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे तो कादंबरीविषयीचा लेख आहे, तसा त्या निमित्ताने इतर निरीक्षणे मांडणाराही लेख आहे.
‘फेसबुक’ किंवा ब्लॉगवर पुस्तकाचा वा सिनेमाचा परिचय म्हणा, वा त्याबद्दलचं शेरेवजा मत म्हणा, लिहिताना आपण काय करत नाही आहोत याचं भान कायम असतं. या लेखानं ते अजूनच धारदार केलं.
लेखाच्या सुरुवातीलाच लेखकानं आपल्या लेखाच्या मर्यादाही नेमक्या आखून मांडलेल्या आहेत.
आशय वा आशयाबद्दलची लेखकाची मनीषा, आशय सखोलपणे आणि परिणामकारकपणे व्यक्त व्हावा यासाठी वापरण्याची लेखनतंत्रं आणि त्यांतला सफाईदारपणा वा त्याचा अभाव, लेखनापूर्वीचं संशोधन आणि त्याचा बरावाईट वापर, निवेदनपद्धती... यांविषयी सडेतोड आणि सोदाहरण असमाधान व्यक्त करणार्या या लेखामध्ये लेखकाविषयी अतिशय सहृदय अशी आस्था आहे. लेखकानं केलेल्या आणि त्याला जमलेल्या चांगल्या गोष्टींविषयी कौतुक आहे आणि मग मर्यादांची चिकित्सा आहे. इतक्या त्रुटी असूनही लेखकाच्या साहित्यकृतीची चर्चा होत असेल, तर त्यात एकंदरीत साहित्यविश्वातली परिस्थिती कशी कारणीभूत आहे, याचं नेमकं भान आहे. ‘याला लोकांनी जामच डोक्यावर घेतलाय, आता याला याची जागाच दाखवून देतो की नाही बघा’ किंवा ‘बघा याच्या कशा चिंध्या-चिंध्या करतो’ असा अभिनिवेश नाही.
असा अभिनिवेश मध्यंतरी ‘मुक्त शब्द’मध्येच आलेल्या उदय रोटे यांच्या, निखिलेश चित्रेंच्या ‘गॉगल लावलेला घोडा’विषयीच्या लेखात दिसला होता. अतिशय वाईट वाटलं होतं. सर्वसामान्य वाचकाला थोड्या श्रमानिशी समजू शकेल (accessible to layman reader) अशी चिकित्सा - आणि टीकाही - व्हायला हवीच, पण त्या चिकित्सेला लेखकाविषयीच्या आस्थेची जोड असणं किती आवश्यक आहे – एरवी ती चिकित्सा कशी अस्पृश्य ठरते, ते जाणवून खंतावायला झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर या लेखाबद्दल कृतज्ञ वाटलं.
लेखकाचा एक परिच्छेद उद्धृत केल्याशिवाय पुढे जाववत नाही –
...ब्लर्ब, परिचय, परीक्षणे, प्रस्तावना आणि समीक्षा लिहिणार्या सर्वच मान्यवरांना एक नम्र अशी विनंती या निमित्ताने करावीशी वाटते, की कृपा करून अतिशयोक्त प्रशंसा करण्याच्या आणि केवळ चांगले चांगले लिहिण्याच्या या पद्धतीस थोडातरी आळा घाला. एखाद्या साहित्यकृतीवर दहा ओळी लिहिणार असाल तर आठ ओळी त्या साहित्यकृतीच्या बलस्थानांबद्दल किंवा चांगल्या गोष्टींबद्दल लिहा पण दोन ओळीतरी त्या साहित्यकृतीतील तुम्हांला जाणवणार्या मर्यादांबद्दल लिहा. की तुम्हांला साहित्यकृती वाचताना मर्यादा दिसतच नाही? की त्या बघायच्यात नाहीत? की त्या दिसतात, लक्षातही येतात; परंतु त्याबद्दल लिहायचे नाही, असे काही आपण ठरवले आहे का?...
