तिशीच्या पल्याडचे आपण लोक अशा काळात जन्माला आलो होतो, जेव्हा चांगला करमणुकी आणि/वा ज्ञानवर्धक माल (शुद्ध मराठीत : कंटेंट) फुकट मिळत नसे. मुद्दाम शोधावा लागे. त्याला थोडा तरी पैसा मोजावा लागे. कष्ट घ्यावे लागत. वेळ खर्चावा लागे. त्यामुळे अशा कंटेंटची लसलस आपल्यात मुरली आहे. आता डेटा दुथडी भरून वाहत असताना, पुस्तकं आणि सिनेमे आणि गाणी कधी नव्हती एवढी सहजी - अनेकदा फुकट उपलब्ध होत असताना, कायदेशीर मार्गानं घरपोच येत असतानाही... कंटेंट असू शकेल, अशी पुसटशी शंकाही जरी आली – तरी आपण हावरटासारखे तो माल गोळा करून बुडाखाली सारून ठेवतो.
पीडीएफरूपातली पुस्तकं. हार्ड डिस्का भरभरून जमवलेले सिनेमे आणि टीव्ही मालिका. रस्त्यावर मिळणारी आणि रद्दीवाल्यांकडे मिळणारी आणि किलोवर मिळणारी पुस्तकं. सेलमध्ये मिळणारी पुस्तकं. अशीच घेतलेली आणि न वाचलेली पुस्तकं, दिसेल त्या ओटीटीच्या मेंबरशिपा.... वगैरे वगैरे. याच लसलशीमधून तासनतास रील्स गळत ठेवणं, क्लिकबेटी बातम्या स्क्रोलत राहणं, वाचण्याची सवय हातची सुटत जाणं येत असावं.
एकुणात मालं भारंभार, पण भोगता येत नाही ही परिस्थिती.
यातून सुटायचं कसं? वाचणारीची रोजनिशी लिहून? प्रयोग करून पाहण्याजोगा वाटला. म्हणून हा उद्योग.
No comments:
Post a Comment