उन्हातून कातून तुकडा काढावा तसे भासणारे पांढरेशुभ्र गोड दूध, अंगात खूप ताकद भरवणारा रानाचा हिरवा वास, हिरव्याकाळ्या गूढ-जिवंत सावल्या, मऊ पण घट्ट असे देवीचे काळेशार दगडी अंग, पोर मेल्याच्या दुःखाने माणसासारखा शोक करणाऱ्या माकडिणी, शेळीच्या मुताचा खमंग वास, लुटुलुटु चालत ऊन्ह खायला येणारे कासव, मोरीच्या भोकातून येणारा चिवचिवता तांबूसकोवळा प्रकाश, पांढऱ्या मातीने सारवलेल्या भिंतीत तापवून वाकवलेल्या बांगडीच्या काचा रुतवून केलेली हिरवीगार चमचमती वेल, चांदी पसरल्यासारखे दिसणारे स्तब्ध पाणी, कुणीतरी पलीकडे जावे तशी सहज स्वप्नात जाणारी चिंगुआजी...
श्रीनिवास कुलकर्णींचं 'डोह' वाचताना किती प्रतिमा पिऊन घ्याव्यात नि किती नाही, असं काहीतरी होत होतं. पण मला किंचित जळफळता रागही येत होता.
औंदुबर या तीर्थक्षेत्राच्या गावी लेखकाचं बालपण गेलं. त्या काळातल्या आठवणींची ही चित्रं आहेत. त्यांचं लालित्य, प्रतिमांचं सौंदर्य - श्रीमंती, भाषेचा गोडवा आणि अर्थवाहीपण, बघता बघता प्रतिमांच्या पुलावरून अर्थानिरर्थाच्या पल्याड गूढाच्या प्रदेशात नेणारी त्यांची जादू... हे सगळं वादातीत आहे. त्याबद्दल 'डोह' पुष्कळ वाखाणलंही गेलं आहे. त्यातलं वानरांचं, वाघळांचं, गाईम्हशींचं, शेळ्यामेंढ्यांचं, झाडाझुडपांचं, रानावनांचं, दगडमातीचं, ऊनसावल्यांचं, पाखरापिल्लांचं, देवाधर्माचं, माणसांचं आणि सापांचं विश्व लेखकाच्या नजरेनं बघताना स्तिमित व्हायला होतं, स्वप्नात गेल्यासारखं होतं, हे सारं संपूच नयेसं वाटतं...
पण हे विश्व आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे, आपल्याला ते या शब्दांच्या कृत्रिम खिडकीतूनच बघावं लागणार, तितका आणि तितकाच रस्ता या गेल्या पिढीतल्या माणसांनी शिल्लक ठेवला आहे... असं काहीतरी मला वाटत राहिलं. पुष्कळ श्रीमंत पण उधळपट्टीने खंक होऊन बसलेल्या बेजबाबदार बापाच्या पोटच्या मुलांना वाटावं, तसं. प्रिव्हिलेज्ड असणं वा नसणं हे काय फक्त जतिनिहाय वा आर्थिक स्थितिनिहाय असतं थोडंच? आपल्या आधीच्या पिढ्यांमधली, मन भरून निसर्ग उपभोगलेली आणि आता आपल्याकरता हे सिमेंट-धूर-डॉल्बीचं जग ठेवून गेलेली माणसंही प्रिव्हिलेज्डच असतात. आपली सगळी पिढीच या बाबतीत दलित-वंचित... असा तो राग.
वास्तविक मी तद्दन शहरी व्यक्ती आहे. मला खेडेगाव आणि तिथल्या आयुष्याचे कढ कदापि येत नाहीत. कुठल्याही मुलानं आपल्या भवतालातल्या, त्याच्याकरता 'नैसर्गिक'च असलेल्या वास्तुविशेषांचे, वस्तुविशेषांचे, माणसा-झाडा-जीवांचे, आणि वासा-आवाजांचे सगळे रंग टिपून घ्यावेत, तसं मी शहर टिपून घेत आले आहे. तोही निसर्गच आहे हे ठासून सांगत, त्याचं जिवंतपण भोगत आले आहे. पुढेही आणि इतर अवकाशांमध्येही माणसं हे करतीलच. पण तरी - हे जे काही श्रीमंत, संपृक्त, व्यामिश्र जग होतं, ते लोपलं हे उरतंच. त्याचा हा विषाद.
श्रीनिवास कुलकर्णींची इतर दोन पुस्तकं वाचताना त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांच्या तुलनेत तरुणपणीच्या अनुभवांमध्ये येत गेलेलं पोकळपण, तेच-ते-पण, बळंच-गूढत्व बघून जरा विटायला झालं. पण त्यानं 'डोह' आणि त्यातल्या विश्वाबद्दल वाटणारा मत्सर कोमट झाला नाही. तो धारदारपणे सलत राहावा, इतकी त्या पुस्तकाची धार जिवंत आहे.
डोह
श्रीनिवास कुलकर्णी
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९६५





