एखादं पुस्तक वाचताना त्याच्या प्रकृतीच्या, त्याच्या विषयातल्या, आणि त्याच्या जवळच्या अनेक विषयांची आठवण जागी होत जाण्याचा अनुभव कमी वेळा येतो. मुकुंद कुळ्यांच्या ‘इतिहासाचे साक्षीदार’ या छोटेखानी पुस्तकानं तो अनुभव दिला. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेलं हे पुस्तक मराठेकालीन संस्कृतीच्या ‘जड’ बाजूविषयी माहिती पुरवतं.
मराठ्यांनी महाराष्ट्रात आणि भारतभर नद्यांवर बांधवलेले घाट, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, त्यांचे उपयोग आणि सौंदर्य, त्यांना लगडून असलेल्या वदंता आणि कहाण्या. महाराष्ट्रामधल्या बांधवून घेतलेल्या बारवा उर्फ बांधीव विहिरी आणि राजस्थान-गुजरातशी तुलना करता दिसणारा त्यांचा साधेपणा. मराठाकालीन वस्त्रप्रावरणं, दागदागिने, त्यांच्यामधली कलाकुसर-शौकीनपणा-श्रीमंती आणि उपयुक्तता. महराष्ट्रातले विशेषतः पेशवेकालीन वाडे आणि त्यांच्या रचना. खास मराठ्यांनी वापरात आणवलेली, लोकप्रिय केलेली, गाजवलेली शस्त्रं – भाले-तलवारी-बिचवे-वाघनखं-कट्यारी आणि अर्थात दांडपट्टा. त्यांची वैशिष्ट्यं, गुणदोष, मर्यादा आणि बलस्थानं. त्यांच्यासह पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जिवा महालाच्या आणि अफझलखानाच्या आणि शिवरायांच्या गोष्टी. आणि पानपतावर दगा देणार्या आणि मराठ्यांना कायम हुलकावणी देत आलेल्या जडशीळ तोफा... हे ‘इतिहासाचे साक्षीदार’मधले कुळ्यांनी घेतलेले विषय. त्यात इतर ऐतिहासिक तपशील वेळोवेळी येत असले, तरी मुख्य भर मराठाकालीन इतिहासावर आहे.
त्यामुळे ते वाचताना ‘शिवकालीन महाराष्ट्र’ (राजहंस प्रकाशन) या अ. रा. कुलकर्णीलिखित पुस्तकाची आठवण होणं क्रमप्राप्त होतं. मराठी राज्याच्या विशेषतः व्यवस्थापकीय बाजू कशा चालत, त्यात कोणत्या संकल्पना-वस्तू-हुद्दे इत्यादींना कोणती नावं होती हे त्या पुस्तकात येतं. तत्कालीन शेती-उद्योग-अर्थव्यवहार-प्रशासन अशा अनेक बाबतींतली अतिशय रसाळ माहिती देणारं हे पुस्तक वाचताना एखाद्या भव्य पण द्विमित चित्राचं त्रिमित रूप अनुभवायला मिळाल्यासारखं वाटून हरखून जायला झालं होतं. त्या पुस्तकाला नेटकी संदर्भयादी आहे. तशी यादी कुळ्यांच्या पुस्तकाला नाही, ही उणीव जाणवली. पण तरी ‘इतिहासाचे साक्षीदार’ची जातकुळी अचूक तीच आहे. खेरीज ‘शिवकालीन महाराष्ट्र’मध्ये अजिबात नसलेली, सुरस अशा लोककहाण्यांची आणि आख्यायिकांची बाजू कुळ्यांच्या पुस्तकाला आहे. संभाजीपुत्र शाहू महाराजांची उपस्त्री असलेल्या बिरूबाई त्यांनी लिंबशेरीला बांधवून घेतलेल्या बारवेच्या वरच्या बाजूला असलेल्या खास खोलीत महाराजांसह गप्पा करत बसत; किंवा आपल्या सावकारांनी बांधवलेल्या देखण्या घाटाचं श्रेय लाटायला मिळत नाही म्हटल्यावर दुसर्या बाजीरावानं तस्सा घाट बांधायला घेतला, सावकारांच्या घाटाचं पाणी तोडलं, नि वर आपला घाट पूर्ण न करताच पळ काढला; किंवा दानधर्म करणार्या आणि त्यासाठी पैसा वेचणार्या अहिल्याबाई होळकरांना घाटांची राणी म्हटलं जाई... अशा अनेक कहाण्या या गद्य तपशिलांमध्ये प्राण फुंकतात. हे अ. रा. कुलकर्णींच्या पुस्तकाबाबत घडत नाही. ते काहीसं रूक्षच राहतं.
सरतेशेवटी अशा प्रकारच्या पुस्तकांचा सरताज भासणारं पुस्तक -
रूढार्थानं मराठ्यांच्या इतिहासाबद्दल नसलं, तरी इतिहासाच्या ‘जड’
उर्फ ‘लौकिक’ बाजूबद्दलचं
अतीव रसाळ आणि दिलखेचक पुस्तक. म. वा. धोंडांचं ‘ज्ञानेश्वरीतील
लौकिक सृष्टी’ (मौज प्रकाशन). ते अर्थात आठवलं. ज्ञानेश्वरी म्हटल्यावर ओघानं
येणार्या आध्यात्मिक चर्चा बाजूला सारून तत्कालीन चलन, सोन्याचा
कस मोजण्याचे निकष, त्यात येणार्या वृक्षांच्या आज सापडणार्या
वा हरवलेल्या खुणा, त्यातल्या शिव्या… अशा
अफलातून गोष्टींविषयी तपशीलवार, उत्कंठावर्धक, आणि रसाळ यात्रा करून यायची असेल, तर त्या पुस्तकाला
पर्याय नाही.
‘इतिहासाचे साक्षीदार’ वाचताना अशी अनेकानेक पुस्तकं आठवली. आणखी एक दुखरा प्रश्नही पडला - ‘शोध’कर्त्या मुरलीधर खैरनारांच्या वाचनात ‘इतिहासाचे साक्षीदार’ आलं होतं का असा तो प्रश्न. त्यांनी यांतल्या किती तपशिलांचा वापर करून काय-काय मौज केली असती आणि आपण त्यांच्या डोक्यातल्या किती जब्बर ऐतिहासिक शोधकादंबर्यांना मुकलो, कुणास ठाऊक.
इतिहासाचे साक्षीदार
मुकुंद कुळे
मनोविकास प्रकाशन
प्रथमावृत्ती २००६





No comments:
Post a Comment