Thursday, 28 September 2023

एक नाटककार आणि काही नाटके

एक नाटककार आणि काही नाटकेहे सुधीर रसाळांचं पुस्तक. तो नाटकांवरच्या समीक्षापर लेखांचा संग्रह आहे. वाचायला सुरुवात केल्यावर काहीसं जड जात होतं. कारण समीक्षा वाचायची सवय नाही. मी साहित्याची विद्यार्थिनी नाही. त्यामुळे प्रतिमासृष्टी, विपरीतता, तज्जन्य कृतिपरिवर्तन, प्रेरणाजागृती, प्रेरणातृप्ती, प्रेरणाभावपरिवर्तन... असे खडे दाताखाली येत होते. पण नेटानं वाचत राहिले. त्याचं फळ मिळालं. रत्नं हाती लागली.


विंदांनी केलेलं
किंग लिअरचं भाषांतर, सवाईमाधवरावांचा मृत्यू हे खाडिलकरांचं नाटक, ‘सखाराम बाइंडरआणि तेंडुलकर, तारा वनारसेंचं कक्षाहे नाटक, खानोलकरांचं एक शून्य बाजीराव’, आणि नाटकाच्याच कक्षा विस्तारणारी एलकुंचवरांची नाटकं या विषयांवरचे लेख या संग्रहात समाविष्ट आहेत. त्यांपैकी कुठल्याच लेखामध्ये प्रयोगाची समीक्षा नाही. त्यामुळे नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा, अभिनय, पार्श्वसंगीत, संवादफेक... या नेहमी नाट्यसमीक्षेमध्ये केंद्रस्थानी असणार्‍या आणि भाव खाऊन जाणार्‍या गोष्टी नाहीत. सगळे संहितालक्ष्यी (मनापासून वाचणारा वाचक लेखकाची भाषा आत्मसात करतो ती अशी! च्यामारी!) आणि 'तबियतसे' लिहिलेले दीर्घ लेख आहेत. 

(राजीव नाइकांच्या लागलेली नाटकंची आठवण होत होती. पण लागलेली नाटकंमध्ये नाईक मनापासून नाटकात शिरून गप्पा मारत एकेक मजा सांगत असल्यासारखे भासतात. तसं करताना स्वतः विचारात पडायला न बिचकणारे, स्वतःलाच तपासून बघणारे, मध्येच एखादा विनोद लक्ष्यात येऊन त्याचीही मौज लुटायला निवांतपणे थांबून मग पुढे जाणारे, हव्या तितक्या वाटा-आडवाडा-चोरवाटा ढुंडाळणारे... असे भासतात. पण छे! ‘लागलेली नाटकंहा निराळ्या लेखाचा विषय आहे. त्या मानानं रसाळांची भाषा जरा चश्मिष्ट आहे.)

सर्वाधिक आवडलेला लेख सखाराम बाइंडरवरचा. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, आणि चिन्मयी सुर्वे यांच्या बाइंडरच्या प्रयोगाचं मुद्रण मी पाहिलं आहे. तोवर फक्त सारंगांचं बाइंडरचे दिवसवाचल्यामुळे डोक्यात सखाराम वा लक्ष्मीपेक्षाही चंपाचा प्रभाव होता. पण त्या मुद्रित प्रयोगातली सोकुनं केलेली लक्ष्मी बघताना हादरून जायला झालं. हा लेख वाचताना मला त्या मुद्रणाचा  अतिशय अतिशय उपयोग झाला. चंपा-सखाराम-लक्ष्मी-दाऊद-फौजदार या व्यक्तींच्या आयुष्यातल्या घटनांचं – काहीसं चाकोरीबाहेरचं – नाट्य इतकीच पातळी मला तो प्रयोग बघताना समजली होती. नटांच्या विलक्षण ताकदीनं झपाटलं होतं. पण त्या विशिष्ट पात्रांच्या गोष्टीपल्याड नाटककार काय म्हणू बघतो आहे, याचा उलगडा होता झाला नव्हता. या लेखानं मला ती वाट दाखवली. जगताना बरंवाईट ठरवणारी व्यक्तीची मूल्यसरणी आणि व्यक्तीच्या नैसर्गिक प्रेरणा यांच्यातल्या झगड्याची ती कहाणी कशी ठरते आणि ती सांगताना तेंडुलकर स्वतःच्याच लेखणीला पडलेली कुंपणं कशी उधळून लावतात, ते रसाळांनी या लेखात सांगितलं आहे. त्या उलगड्यामधल्या नाट्यानं मला एकदम थरारून गेल्यासारखं झालं. 

एखाद्या गेममधली पुढची लेव्हल कितीतरी दिवस गाठताच येऊ नये, आणि एखाद्या प्रो इसमानं तिची वाट दाखवल्यावर एकदम येडबंबूसारखं आणि भारित-चकित असं दोन्ही वाटावं तसं झालं.

तसंच किंग लिअरबद्दलच्या लेखाचंही. तीन दीर्घ तुकड्यांमधला हा लेख किंग लिअरबद्दलचा जितका आहे, तितकाच इतर अनेक गोष्टींबद्दलचाही आहे. शोकांतिका म्हणजे काय, आपण एका संस्कृतीमधून दुसर्‍या संस्कृतीतल्या कलाकृतीचं आकलन करून घेताना आपल्याला कोणत्या मर्यादा येऊ शकतात, त्यामागे कोणती कारणं असतात, धार्मिक विचारव्यूहांमधल्या अंतरांची त्यात भूमिका असते का, एखाद्या कलाकृतीची समीक्षा वाचून मग तिचं केलेलं आकलन आणि आपलं रॉ आकलन यांत काय फायदे-तोटे संभवतात, मानवी भावभावनांविषयी आत्मीयता असणारा नाटककार कसा नि कुठे दिसतो... असे अनेक प्रश्न विचारत-उत्तरं पुरवत रसाळ या नाटकाच्या भाषांतरित संहितेविषयी लिहितात. हा लेख मूळ इंग्रजी संहितेविषयी नाही, जितकं हे भाषांतर नेमकं असेल, तितकाच हा लेख मूळ संहितेला लागू होईल, असा खुलासा आधीच करतात. किंग लिअरमधल्या निरनिराळ्या पात्रांची पार्श्वभूमी, त्यांचे उघड-छुपे हेतू, घटनाक्रम आणि त्यांचं नाट्यगत यशापयश, कच्चे दुवे, लिअरचा व्यक्ती म्हणून झालेला प्रवास, मानवी भावभावनांचा पट आणि त्यात दडलेली शोकान्त आवर्तं... सर्वसामान्य प्रेक्षकासाठी रंगतदार कथानक आणि जीवनाविषयी चिंतन-आकलन करू शकणार्‍या-इच्छिणार्‍या प्रेक्षकासाठी नाटकात असलेला व्यूह – अशा नाटकाच्या दोन निरनिराळ्या पातळ्या... हे सगळं एकेक करून सावकाश उलगडत दाखवून देतात.

माझ्यापर्यंत शेक्सपिअर पोचला असेलच, तर तो रूपांतरांमधूनच. विशाल भारद्वाजचे मकबूल’, ‘हैदर’, ‘ओम्कारा’, 'कमीने' पुन्हा पुन्हा आठवत राहिले. ते पुन्हा बघावेत, या लेखाचं परत वाचन करावं, त्या रूपांतरांची परिणामकारकता तपासून बघावी, पुन्हा पुन्हा शेक्सपिअरच्या गोष्टी जमतील तशा चाचपडून बघाव्यात... असं रसरसून वाटलं. नटसम्राटचं बेगडीपण-अपुरेपण जाणवत राहिलं. 

विंदांचं भाषांतर बहुधा मूळ संवादांची लय सांभाळू पाहणारं आहे. (मी ते वाचलेलं नाही, म्हणून नुसता अंदाज.) पण मराठीतली क्रियापदाची सर्वसाधारण जागा बदलून इंग्रजीबरहुकूम लिहिलेले ते 'झाले आहे मला दुःख!'छाप संस्कृतप्रचुर आणि कृत्रिम संवाद वाचताना अडखळायला होत होतं. हेच संवाद गडकर्‍यांसारख्या कुणी लिहिले असते, तर त्यांना कृत्रिमता न आणता त्यांची भव्यता-नाट्यमयता-लय सांभाळून आणता आली असती का असं वाटून गेलं. त्याविषयी रसाळ काहीच बोलत नाहीत, हे ध्यानात येऊन चुटपुट वाटली.

इतर लेखही आवडलेच. पण या दोघांची विशेष आणि खोल छाप पडली.

फेसबुकीय ठिकाणी आपण लिहितो ती परिचयात्मक टिपणं आणि एखाद्या अभ्यासकानं शांतपणे, समग्र आणि काटेकोर दृष्टीनं एखाद्या कलाकृतीकडे बघणं या दोन्हींत किती-किती फरक असतो – हे जाणवून पुन्हा शरमायला, दबून जायला झालं.

एक नाटककार आणि काही नाटके

सुधीर रसाळ

विजय प्रकाशन

प्रथमावृत्ती २०२२

2 comments:

  1. हा लेख वाचून मूळ नाटके बघावीशी किंवा वाचावीशी नक्की वाटत आहेत. धन्यवाद.

    ReplyDelete