Thursday, 4 April 2024

रिव्हर्स ऑफ लंडन

हा ब्लॉग सुरू केला, तेव्हा निव्वळ पुस्तकांचे परिचय द्यावेत, असं डोक्यात नव्हतं. 

लहानपणापासून एखाद्या पुस्तकी किड्याप्रमाणे वाचन केलं जात असे. त्याबद्दल काही स्वतंत्र विचार करणंही होऊ नये, इतकी ती कृती अंगवळणी पडली. पुस्तक सोबत असल्याचा अजब दिलासा वाटत असे. अजूनही वाटतो. पण स्मार्ट फोन, इंटरनेट, फेसबुक-वत्साप या गोष्टींमुळे वाचनाची सवय बदलत गेली. अगदी खोलात जाऊन पाहायचं, तर नजरेनं पुस्तकाचा मजकूर बकाबका खाल्ला जातो. अधले मधले शब्द सुटून जातात. साधारण आशय कळवून नजर पुढे धावत सुटते. त्यातही अधूनमधून नॉटिफिकेशन्स येतात. लक्ष अनेकदा बाहेर जातं. फेसबुकसारख्या चावडीसदृश माध्यमांमुळे लोकांशी संवादण्याची - खरं तर सतत ठिणग्या उडवत राहण्याची - वाईट खोड लागली आहे. पुस्तकं पूर्वीसारखी दुर्मीळ उरलेली नाहीत. म्हणाल ते पुस्तक म्हणाल तेव्हा हाताशी येतं. बऱ्यावाईट मार्गांनी मिळतंच मिळतं. त्यामुळे पुस्तकं अधाशीपणे बुडाखाली गोळा करून ठेवायची अजून एक वाईट सवय लागली आहे. नुसताच साठा. वाचायला वेळ नाही. 


कुठल्या सवयी बदलल्या तर ही बदलेल, याचं निरीक्षण नकळत होत राहतं. त्याबद्दलच्या नोंदी या ब्लॉगवर करायच्या होत्या. पण इतक्या शिस्तीनं हातून काही होत असतं, तर काय हवं होतं! 


या मूळ हेतूची नोंद करून ठेवते. त्याचबरोबर फेसबुक बंद करून ठेवल्यामुळे वाचनात फरक पडतो याचीही नोंद. 


डिसेंबरात शेवटी कधीतरी काम होत नसल्यानं वैतागून ते बंद केलं. आज त्याला तीन महिन्यांहून जास्त दिवस झाले. मधल्या काळात ‘रिव्हर्स ऑफ लंडन’ ही बेन आरोनोविचची मालिका (Rivers of London : Ben Aaronovitch) पुन्हा नव्यानं हाती घेतली. 



लंडनचं पोलीस खातं अद्भुताच्या प्रांतातल्या गुन्ह्यांची उकल करत असेल, तेही गुपचुप, आणि त्या खात्यात नव्यानंच शिरलेला नायक आजच्या जगातली तिरकस, आधुनिक, कॅज्युअल भाषा वापरून त्या सगळ्याचं वर्णन करत असेल, काय होईल कल्पना करा. त्यात लंडनच्या इतिहासाचं अतिशय नेटकं भान मिसळून द्या. नद्यांची व्यक्तिमत्त्वं डोळ्यासमोर आणा. 


काही वर्षांपूर्वीही मालिका आवडलीच होती. पण मधल्या धबडग्यात सुटूनही गेली हातून. या वेळी जास्त सावकाश, चवीनं वाचली. त्या नायकाच्या काळ्या वंशामुळे त्यांच्या नजरेला आलेली तिरकस आणि सूक्ष्म धार थबकून अनुभवली. त्यांची ब्रिटिश विनोदबुद्धी अनुभवताना मनापासून हसले.    


मालिकेबद्दल स्वतंत्र आणि ऐसपैस लिहीन. तूर्त ही फक्त नोंद. खूप दिवसांनी ब्लॉगकडे परतून यावं वाटलं. वाचन पुन्हा आपलंसं करता येतं, या प्रत्ययानं हायसं वाटलं. मधल्या काळात आवडीनिवडींमध्ये, वाचनाच्या वेगात आणि पद्धतीत बदल झालेले स्पष्ट अनुभवले. 


या निमित्तानं केलेली ही नोंद. बोलत राहू. 


No comments:

Post a Comment