Tuesday, 17 September 2024

एक जुनी मुलाखत : लागू आणि तेंडुलकर व्हाया वागळे

येता-जाता, चालता चालता जुन्या मुलाखती ऐकत होते. तेंडुलकर आणि लागूंची वागळेंनी २००७ साली घेतलेली एक मुलाखत ऐकली.


तेंडुलकर आणि लागू - हे दोघंही अतिशय, अतिशय निराश वाटतात. पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल हे दोन अतिशहाणे म्हातारे मराठी लोकांना घाबरवताहेत की काय उगाच, असंही तेव्हा वाटलं असतं, अशा प्रकारचं, जरा ढोबळ बोलतात. पण मधल्या जेमतेम १७ वर्षांत त्यांच्या भीतीच्या किती पुढे येऊन ठेपलो आपण! त्यांनी व्यक्त केलेल्या पर्यावरणीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक, नैतिक.... अशा सगळ्या सगळ्या शंका सत्यात उतरल्या आहेत, आपण त्या पचवल्या आहेत, आणि तरी आपण बेगुमानपणे, मिळेल तो आनंदाचा किडूकमिडूक तुकडा ओरबाडून भोगत, लाथा मारत-लाथा खात जगतोच आहोत, धावतोच आहोत.... आताच्या आपल्याला बघून काय म्हणले असते हे दोन लोक - असं वाटतं.
लागू आणि तेंडुलकर यांच्यात जुगलबंदी घडवून आणण्याचा वागळेंचा क्षीण प्रयत्न बघून आणि वागळेंना नेमकी नि तिखट उत्तरं देऊन गप्प करणारे तेंडुलकर बघून खूप गंमत वाटते. पण त्याचबरोबरीनं - "माझ्यासारखा माणूस काय करू शकतो म्हणजे? नोकरी सोडू शकतो. मी सोडल्या आहेत. जेव्हा परिस्थिती सगळ्या बाजूंनी वाटा बंद करते, तेव्हाही वाट निघतेच. निघेलच." असं कमाल वास्तववादी, निर्भीड, बाणेदार उत्तर देणारे तेंडुलकर बघून स्वतःचं यूट्यूब चॅनल काढणारा रवीश, त्याच्यासारखे अनेक पत्रकार आणि २४च्या निवडणुकीवर त्यांनी घडवून आणलेला परिणाम आठवतो. तेंडुलकरांच्या दीर्घदृष्टीचं अजब-अजब वाटतं.
"आमची पिढी गाफील राहिली. स्वातंत्र्य आलं म्हणजे सगळे प्रश्न संपले असं मानून आम्ही आमच्या विषयापुरते उरलो." असं म्हणणारे लागू बघून स्वतःबद्दल सावध व्हायला होतं. भाजपचं सरकार गेलं की सगळे प्रश्न संपणार नाहीयेत, भाजपला सरकारात बसवणारे लोक आपणच होतो आणि आपण जर बदललो नाही, तर आपण ते तसेच्या तसेच पुढेही असणार आहोत, अशी चरकायला लावणारी जाणीव होते.
हे दोन लोक जाहीरपणे बोलणार म्हणून बघायला-ऐकायला समोर जमलेला प्रेक्षकसमुदाय, तुडुंब भरलेलं सभागृह, त्यांचा जिवंत प्रतिसाद बघूनही जरा थबकायला होतं. स्वतःला कलाकार म्हणवणारे आणि सामाजिक-राजकीय बाबींविषयी गंभीरपणे विचार मांडू शकणारे असे कोण लोक आज अशी गर्दी जमवू शकतील? विचार करकरूनही उत्तर सुचत नाही. भ्यायला होतं. आणि तरी तेंडुलकरांच्या बोलण्यातलं बाकी सगळं सोडून त्यांच्या नियतीप्रेमाबद्दलच टाळ्या पिटणारे लोकही दिसायचे राहत नाहीत. वाटतं, साला, आपण लोकच असे दळभद्री की काय? समोर लागू आणि तेंडुलकर काहीतरी म्हणताहेत, आणि आपल्याला त्यांच्या बोलण्यातले हे नियतीबियतीसारखे सैल-विशविशीत धागे तेवढे उराशी धरावेतसे वाटावेत?
जुन्या मुलाखती ऐकणं इतकं विचारात पाडणारं असेल, याची मला कल्पना नव्हती. त्याही बाबतीत या दोन माणसांनी धक्का दिला.

No comments:

Post a Comment