फेसबुकाची सवय लागली आणि
ब्लॉग बॅक-अपपुरता उरला. धार्मिक-राजकीय उन्मादकाळात फेसबुकवरच्या गर्दीनंही घाम
फुटू लागला आणि तिथून फारकत घेतली. मग निवडणुका आणि व्याकूळता आणि अस्वस्थता या
सगळ्याला व्हॉट्सॅपची किनार होती, आहे. तिथून अधिक आश्वस्त करणारी सोबत
मिळवता आली, काही प्रमाणात पुरवताही आली. पण आता निकाल काहीही
लागला, तरी तिथलं मायक्रोलेखनही हळूहळू आटत जाईल.
तंत्रज्ञान, माध्यमं, आणि वस्तू
मिळून आपल्या मेंदूतल्या जोडण्या बदलत असतात हे आता आपल्याला
नवीन नाही. त्यावर उत्तर काय, हे मात्र अजुनी तितकंसं धडपणी कळलेलं नाही. मधल्या
काळात बघणं, वाचणं झालं. पण ‘आला मनात विचार,
टिचव दोन पैसे,’ हे झालं नाही. आपण नाहीच काही म्हणलो, तर असा
काय फरक पडणार आहे, असा एक काहीसा उदासीन विचार होता. पण हे ठरवून
घडवलं असं म्हणणं म्हणजे स्वतःला फसवणं होईल. काही प्रमाणात मनःस्वास्थ्य
टिकवण्याचा भाग होता, काही प्रमाणात आळस होता. काही प्रमाणात
माध्यमांपासून दूर राहून बघणं होतं. फायदा झाला, नाही असं नाही. पण
सगळ्याची गोळाबेरीज म्हणून जे काही थोडंफार नोंदी ठेवणं होतं, ते
संपून गेलं.
या टप्प्यावर आपल्या लिहिण्या-वाचण्यात, बोलण्यात-ऐकण्यात,
एकूणच वावरण्यात आणि जगण्यात आलेली अस्वस्थता, अधीरता,
व्याकूळता, एकटेपणा, धास्तावलेपणा फारच प्रकर्षानं जाणवतो आहे. डाचतो आहे. अशा वेळी
सवयीच्या माध्यमाच्या काडीचा आधार न वाटला, तरच
नवल. म्हणून ब्लॉग.
काय वाचणं, काय बघणं चालू आहे,
त्याच्या नोंदी ठेवणे इतकाच या बॅक टु ब्लॉग प्रकल्पाचा अर्थ. व्यक्त
झालेली मतं चिमूटभर मिठासहितच घ्यायची.
~
वस्त्रहरण
या गंगाराम गवाणकर लिखित नाटकाला ४४ वर्षं झाली.
मच्छिंद्र कांबळींनी गाजवलेलं हे नाटक मी पाहिलं नव्हतं. म्हणून उत्सुकता होती.
त्याखेरीज, ‘ललित कला केंद्रा’च्या विद्यार्थ्यांनी
परीक्षेसाठी केलेल्या प्रयोगातल्या सिगारेट फुंकणार्या सीतेच्या पात्रानं झालेला
गदारोळ डोक्यात ताजा होता. ‘वस्त्रहरण’ हे कोकणातल्या
दशावतारी मंडळींनी केलेल्या नाट्यप्रयोगाबद्दलचं नाटक. त्यात काय-काय धमाल घडत
असेल नि स्कॅंडलाइज न होता प्रेक्षक ही धमाल कशी अनुभवत असतील, याची
कल्पनाही नीटशी करता येत नव्हती. संतोष पवारांचं महाभारतावर आधारित असलेलं ‘यदाकदाचित’
अगदी ताजं असताना आणि नंतरही एकदोनदा पाहिलं होतं, आवडलं
होतं. पण सध्याच्या राजकीय उन्मादकाळात तेही रंगमंचावर होणं कठीण आहे. अशा
वेळी 'यदाकदाचित'चा हा मूळपुरुष कसा दिसतो, वावरतो… त्याबद्दल अपार
कुतूहल होतं.
प्रयोग अनुभवला. खूप धमाल आली. नाटक मला किंचित
लांबलेलं वाटलं, पण ते अपेक्षितच होतं. आपल्याला आता पुष्कळच
जास्त वेगाची सवय झालेली आहे. हे अर्धशतक जुनं नाटक किंचित संथ वाटणारच. पण मजा
म्हणजे स्वतःच्या या घायकुतेपणाची जाणीव व्हावी, इतका धमाल प्रतिसाद
प्रेक्षागृहातून होता. प्रयोग हाउसफुल्ल होता. लोक मनमुराद खिदळत होते. दारू पिऊन
तर्राट असलेला अर्जुनाचा पार्टी, यच्चयावत पात्रांनी सूत्रधाराच्या धोतराला
हात घालणं, सूत्रधाराच्या गोप्या नामक हरकाम्याचा मुक्त वावर,
भलत्या जागी गदा लागल्यावर फेंगडत जाणारा दुर्योधन, बाईचा
नाच बघण्याची इच्छा फेडून घेणारा देवाच्या अंगात आलेला देव, बाई
स्टेजवर आली म्हणताना पाघळलेले तालीममास्तरांपासून ते सूत्रधारापर्यंत एकजात सगळे
कोकणी बाप्ये, परक्या बाईच्या अंगाला हात लावू न देणारी
दुःशासनाच्या पार्ट्याची बाईल… हे सगळे ट्रोप्स आणि त्यातले अश्लील होता-होता
थबकलेले पण अजिबात न लाजता लिहिलेले निःसंशय चावट संवाद. दमदार संगीत. सगळ्यांवर
कडी म्हणजे मालवणी बोलीचा सहज गोडवा. मजा का येऊ नये!
अगदी लहानलहान भूमिकांमध्येही कसलेले जबरदस्त नट
असले की त्यानं नाटकाच्या अनुभवात किती नि कशी भर पडते, ते परत एकदा
अनुभवलं. नटसंच बघताना मला उगाचच किंचित अभिमान वाटला. एरवी आपली नजर कायम आपल्या
रम्य भूतकाळात रुतलेली असते, पण या नटसंचात जुने-जाणते असे जबरे नट होते,
तितकेच नव्या दमाचे आणि लोकांना बांधून ठेवणारे खणखणीत नटही होते. असे
नट काही प्रयोगांकरता का होईना, एकत्र येऊन हे चाळीसेक वर्षं जुनं नाटक करतात आणि
लोक ते बघायला येतात, हे अनुभवताना मला जाम भारी वाटलं. असंही वाटलं,
की सामाजिक-सांस्कृतिक अवकाशात फुसक्या गोष्टींचं भांडवल करून भावना
दुखावल्या म्हणून बोंब ठोकणार्या राजकीय झुंडींमधली हवा काढून घ्यायची असेल, तर
प्रेक्षक जाणता आणि जागता हवा. देवादिकांची निर्मळ चेष्टा करून पोट धरून हसणार्या–हसवणार्या
नाटकांची आपली परंपरा जिवंत ठेवणे हाच त्यासाठीचा राजरस्ता असू शकतो, की नाही?
‘वस्त्रहरण’ जिवंत ठेवणार्या
सगळ्यांबद्दल जाम कृतज्ञता वाटली.
~
‘लापता लेडीज’
थेटरात दोनदा आणि ‘नेटफ्लिक्स’वर
एकदोनदा पाहिला. निलाजरेपणी पैसे खाणारा नि गाणार्या बाईकडून ठुमरी ऐकून
त्याबद्दल्यात लाचेचे थोडे पैसे कमी करणारा पोलीस इन्स्पेक्टर हे या वर्षातल्या
हिंदी सिनेमांमधलं सगळ्यांत धमाल पात्र असेल बहुधा. या भाबड्या, गोड,
काहीशा स्वप्नील पण तिरकस सिनेमातल्या ताज्या दमाच्या नटनट्या बघताना
डोळ्यांत आनंदानं पाणी आलं. राम संपतची गाणी कॅसेटकाळातल्यासारखी पिसून पिसून
ऐकली. मजा आली.
~
बेबी
मी तेंडुलकरांचं ‘बेबी’ वाचलं
नव्हतं. नुसतीच त्याबद्दलची लोकांची वक्तव्यं ऐकून आ वासला होता कायम. सत्यदेव
दुबेंना म्हणे ते शतकातलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटलं होतं.
मुकुंद
टाकसाळेंमुळे ‘बेबी’ वाचायला मिळालं. आवडलं मला, नाही
असं नाही. पण अगदी खरं सांगायचं तर ‘इतका का बुवा याचा बडेजाव?’ असं
वाटलं.
एका गुंडानं सर्वथैव शोषण केलेल्या एका बहीणभावंडांची ती गोष्ट, असं
त्याचं एका ओळीत वर्णन करता येईल. अर्थात नाटक त्याहून पुष्कळ काही आहे. त्याबद्दल
लिहिलं जाईल तितकं थोडं आहे. पण सत्तरीच्या दशकात
त्यातल्या लैंगिक शोषणाची जातकुळी प्रेक्षकाला जितकी धक्कादायक वाटली असेल,
तितकी आज मला अजिबातच वाटली नाही. लैंगिकतेचे निरनिराळे रोगीट आणि
निरोगी आविष्कार, त्यामागचे गुंते, त्यातल्या शोषणाच्या
नाना परी... आजच्या प्रेक्षकाला पुष्कळ खुलेपणानं ठाऊक आहेत. त्यामुळे त्याचा
धक्का नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे शिवाप्पाचं पात्र. कुठलाही चांगला नट त्या
पात्राचीही बॅकस्टोरी खणून काढेल, हे जरी खरं असलं, तरी
मुळात त्या पात्राचे खलत्वाचे रंग फार फार गडद-एकेरी आहेत असं वाटलं. त्यामुळे
माझा थोडा रसभंग झाला. बाकी बेबीच्या निरागसतेबद्दल, स्वस्त साहित्यातून
तिला मिळत असलेल्या बळाबद्दल, राघवच्या पात्रामधल्या शोषणकर्त्याबद्दल नि
शोषिताबद्दल खूप काही खूप जणांनी पूर्वीच म्हटलेलं असणार.
पण Has it aged
well? Well… चटकन तोंड भरून होकार देववेना मला.~
द लायन किंग
‘द लायन किंग’चा ट्रोपच काय, गोष्टही चिरपरिचित.
जुनीही. तरी नाटक बघायला अशक्य मजा आली. एकाच नाट्यगृहात पंचवीसेक वर्षं चाललेलं आणि
आजही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खेचणारं नाटक. किती साधीसाधी तंत्रं! बांबूच्या घोड्यांचा
वापर करून जिवंत केलेले जिराफ. एका विशिष्ट कोनात डोक्यावर पेहरलेले मुखवटे आणि मानेच्या
वैशिष्ट्यपूर्ण हालचाली करून चतुष्पाद प्राण्यांच्या हालचालींचा आणवलेला आभास. हरणांच्या
बाह्याकृतीचे सांगाडे आणि त्यांना चाकं लावून करवलेल्या त्यांच्या पायांच्या धावत्या
हालचाली,
ते हाती धरून नाचर्या पायांनी पळणारे समूह आणि त्यातून जिवंत केलेले
हरणांचे कळप. उंच काठ्यांना भिरभिर्यासारख्या फिरत्या चक्र्या लावून जिवंत केलेले
पक्षी. कापडाच्या प्रचंड मोठ्या फिरत्या रिळांमधून वरखाली केल्या जाणार्या शिंगांच्या
आकृत्या आणि त्यातून जिवंत केलेला रानगव्यांच्या पाठलागाचा प्रसंग. सांगावं तितकं कमी!
तीन मजली प्रेक्षागृह, त्याला दोन
पाखांनी असलेल्या वाद्यवृंदाच्या गॅलर्या, आणि खुद्द मंच...
हा सगळाच्या सगळा – उंचीसकटचा – अवकाश वापरून जिवंत केलेला जंगलाचा आभास. कुठे डोलकाठ्यांसारख्या उंच काठ्यांवरून भिरभिरणारे
पक्षी, कुठे प्रेक्षागृहातून धावत अवतरणारे प्राणी, कुठे वाद्यमेळाच्या जागांतून डोकावणारे प्राणी... या सगळ्यातली कल्पकता अचंबित
करून गेली.
संगीत आणि भाषाही थोडी बिनसरावाची असली, गोष्ट जुनीच
असली, तरी नेपथ्य-रंगभूषा-वेशभूषेच्या या जादूनं तीन तास मंत्रमुग्ध करून ठेवलं. कर्टन कॉल अनुभवताना टाळ्या पिटणारे हात आणि ताल धरणारे पाय थांबता थांबेनात. पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या चेहर्यावर एकच हरखलेलं हसू. साहेबाच्या देशाच्या या श्रीमंतीचं अप्रूप-अप्रूप वाटलं.
~
तात्पर्य
अवधूत डोंगरेनं ‘साधने’त
मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी. एरवी मुलांसाठी गोष्ट लिहिताना जे नाट्यपूर्ण घटक
सहसा अनिवार्य मानले जातात, ते या गोष्टींमधून गायब आहेत. साध्यासाध्या,
दैनंदिन गोष्टींबद्दलची निरीक्षणं, मनात उमटणार्या भावना,
त्यामागचा कार्यकारणभाव जमेल तसा समजून घेणं, रोजच्या
आयुष्यातलं विलक्षण काही टिपून घेणं... अशा लहान जीवाच्या कथा. वाचताना एकेकदा गळ्याशी
आवंढा आणणार्या. जिवंत. अशा अजून कथा वाचायची तहान लागली. पण अवधूत डोंगरे हे वाचकाग्रहास्तव
काही लिहिणार्यांपैकी थोडेच आहेत?!~
तात्पर्य : दिसामाजी काहीतरी... :)