Tuesday, 26 September 2023

रामायण आणि महाभारत

देवदत्त पटनाइकांच्या नावाव्यतिरिक्त काही माहीत नव्हतं. त्यांच्या वाट्याला जाण्याची वेळही कधी आली नव्हती. कारण रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधल्या कथा माझ्यापर्यंत आधीच पोचल्या होत्या. त्या कशा पोचल्या असा विचार केला, तर चक्रावायला झालं. आजीनं गोष्टी सांगितल्या होत्या, म्हणतात. पण त्यांची लख्ख आठवण नाही. मूळ पुराणं तर वाचलेलीच नाहीत. टीव्हीवरच्या मालिका अर्थात पाहिल्या आहेत. मराठीतल्या महाभारताधारित कादंबर्‍या आणि इतर पुस्तकं वाचली आहेत. पण हे वाचताना वा पाहतानाही आपण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीच पाहतो-वाचतो आहोत, असा भाव मनात असलेला आठवतो. त्यामुळे या गोष्टी कश्या माहीत, तर आसमंतातून, इतकंच गूढ उत्तर उरलं. असं असताना या गोष्टींबद्दल लिहिणारे - तेही इंग्लिशमधून - देवदत्त पटनाईक मी कशाला गाठतेय! ते गाठायची वेळ आली भाचरामुळे.

"आकाशवाणी म्हणजे काय?" या प्रश्नामुळे दातखीळ बसवून न घेता "आकाशवाणी म्हणजे प्रॉफेसी." असं उत्तर ताडदिशी दिल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटली, रोलिंगबाईंचे आभार मानले, तरी हादरायला झालंच. गोष्टी सांगणंबिंगणं शक्य नव्हतं. पण ही माहिती पुढे पोचवली पाहिजे, अशी एक कर्तव्यभावना मनात होती. तिच्यापोटी पुस्तक हुडकायला लागले. मित्रांकडून पटनाइकांच्या बेसिक विश्वासार्हतेची खातरी करवून घेतल्यावर त्यांची 'सीता' आणि 'जय' ही अनुक्रमे रामायण आणि महाभारतावरची दोन पुस्तकं हाती आली. 



मी अजुनी वाचते आहे. वाचून पूर्ण झालेलं नाही. पण मला मजा येतेय. 

दोन्ही पुराणांकडे बघणार्‍या निरनिराळ्या अभ्यासकांच्या दृष्टीमधला फरक, त्यांच्या अनेकानेक आवृत्त्यांमधले पाठभेद, तज्ज्ञांच्या दृष्टीनं प्रक्षिप्त मानला गेलेला भाग, सगळ्याचा लेखनकाल आणि कथानकाच्या काळाचा साधारण अंदाज देऊ करणं, गोष्टीरूपात गोष्टी सांगत जाताना जादू आणि चमत्कार यांसारख्या गोष्टींना न बिचकणं, तसंच शृंगार-व्यभिचार-वासना या गोष्टींनाही न बिचकणं, त्या सगळ्याला प्रतीक मानलं तर तत्कालीन समाजाबद्दलची कोणती निरीक्षणं दिसतात हे गोष्टीच्या बाहेर येऊन शेवटी टिपांमधून नोंदवणं, त्या गोष्टीतल्या तपशिलांशी फारकत घेऊन असलेले इतर इंट्रेस्टिंग पाठभेद नोंदवणं, गोष्टीत सहजी न दिसणारे काही तात्त्विक निष्कर्ष अधोरेखित करणं, राजकारणी लोकांचा या गोष्टींच्या वापरामागचा दृष्टीकोन संकुचित असू शकेल, हे सूचकपणे पण न बिचकता नोंदवणं... हे सगळं अतिशय नीटस आहे. 

पाश्चात्त्य दृष्टीला जाता-येता एखादी लाथ मारून 'भारतीय दृष्टीला हे असं एकरेषीय दिसत नाही' असं टुमणं अनेकदा लावलेलं दिसतं, पण पाठोपाठ गोष्टीचा अर्थ लावताना लेखकानं स्वतःच अंगीकारलेली विवेकवादी-वास्तववादी दृष्टीही दिसल्यावाचून राहत नाही. मला याचं किंचित हसू आलं. पण एकुणात मूल शहाण्यासारखं वागतंय, तर त्याला 'बघ, वागलासच की नाही शहाण्यासारखा!' असं म्हणून त्याला कुठलाही सुज्ञ वडीलधारा माणूस बिचकवत नाही. तो स्वतःशीच गालातल्या गालात हसतो. तसं माझं हसणं होतं. पटनाइकांना काहीसं कमी लेखणारं, वर्चस्ववादी, अहंकारीही म्हणू हवं तर. पण तरीही एकुणात मला वाचताना अतिशय मजा येते आहे, हे उरलंच. 

भाषा सोपी आहे. लहान वाक्यं आहेत. नजरेला विराम म्हणून जागोजाग लहानलहान रेखाटनं केलेली आहेत. मी निःशंकपणे पुस्तकं पौगंडवयीन भाचराला दिली. पण म्हणून ती बाळबोध आहेत, असंही मला म्हणवेना. कारण त्यात कुठल्याही प्रकारची माहिती देताना हात आखडता घेतलेला नाही. पण ते शक्य तितक्या सौम्य प्रकारे केलेलं आहे. त्यात सारवासारवी नाही, तसा अभिनिवेशही नाही. अमुक 'शुद्ध आणि प्राचीन', तमुक 'प्रक्षिप्त म्हणून अस्वीकारणीय' असाही दृष्टीकोन नाही. कुठे उपदेशाचे डोस पाजलेले नाहीत. सगळं मिळून आज दिसणारी ही गोष्ट, या गोष्टीचे हे निरनिराळे पैलू, या गोष्टीकडे बघणार्‍या या निरनिराळ्या नजरा, हे त्यांचे निरनिराळे चश्मे... असं काहीसं दाखवणारा या दोन्ही पुस्तकांचा बाज आहे.

हे इंग्रजीत मिळाल्याबद्दल पटनाइकांचे अनेकदा आभार मानावेसे वाटले, पण पाठोपाठ, हे मराठीत अशा प्रकारे समकालीन भाषेत, अशा प्रकारे समग्रता आणि तटस्थता - होता होईतो का होईना, पण - सांभाळून, देखण्या प्रकारे का नाही, अशी अनेक वेळा अनेक बाबतींत वाटलेली खंतही नव्यानं वाटली. 

काही गोष्टी वाचताना 'आयला! ही आपल्याला नव्हती माहीत!' असा साक्षात्कार झाला. काही गोष्टींमागचं प्रतीक उलगडल्यावर अद्भुत वाटलं. उदा. अप्स म्हणजे पाणी. अप्सरा म्हणजे पृथ्वीवर पाण्यासारखी बरसणारी, जीवनाला जन्म देणारी, चेतना. अप्सरा आणि तपाला बसलेले ऋषी यांच्यामधलंं द्वंद्व हे पुरुष आणि प्रकृती, जमीन आणि पाणी... यांच्यातल्या द्वंद्वाचं आणि मीलनाचं प्रतीक म्हणून महाभारतात वारंवार येताना दिसतं. हे मला कधीच सुचलं नव्हतं, मी वाचलंही नव्हतं. असे अनेक 'अहा!'-थांबे लागले, लागताहेत. त्यांनी गंमत आणली. भाचराला इ-प्रतीपेक्षा कागदी पुस्तक हवं वाटल्यामुळे मजा वाटली. जाडजूड 'गोष्टींचं पुस्तक' हातात घेऊन वाचण्याचा अनुभव अनेक दिवसांनी घेऊन आनंंदले. 

2 comments:

  1. टिपण आवडलं. अमिष त्रिपाठींनतर पट्टनाईकांचं नाव ऐकण्यात होतं. पण दोघांचीही पुस्तकं वाचण्याचा मुहूर्त लागला नव्हता. आता वाचुन बघेन. धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार. मी अमिष त्रिपाठीच्या वाटेला गेलेली नाही. मला ते अंमळ... असो!

      Delete